
जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत -जिल्हा अधीक्षक कृषी शिवकुमार सदाफुले
जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत –m
रत्नागिरी, दि. ८ )- प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यात भात आणि नाचणी पिकांचा विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यंदा राज्यात अल-निनोचे संकट पाहता, संभाव्य नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमध्ये भात व नाचणी या अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी व अटी:
सहभाग ऐच्छिक: पीक कर्ज घेतलेल्या आणि न घेतलेल्या (कर्जदार व बिगर कर्जदार) अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी या योजनेतील सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे.
आवश्यक ओळख: योजनेत सहभागी होण्यासाठी AGRISTACK शेतकरी ओळख क्र. असणे अनिवार्य आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत ई-पीक पाहणी करणे बंधनकारक राहील.
भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी: कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेस पात्र आहेत, मात्र त्यांना नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
क्षेत्र मर्यादा: योजनेत शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
विमा हप्ता दर: शेतकऱ्यांसाठी विम्याचा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के (जोखीम स्तर ७० टक्के) असून, भात पिकासाठी रु. ६५०.०० प्रती हेक्टर तर नाचणी पिकासाठी रु. ४००.०० प्रति हेक्टर असा दर निश्चित करण्यात आला आहे.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी नियम: पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी किमान ७ दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळवणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा?
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला ७/१२ उतारा, बँक पासबुक, [आधार कार्ड किंवा ओळख दस्तऐवज Redacted] व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन अधिकृत बँकेत, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ च्या मदतीने विमा अर्ज व हप्ता भरून सहभाग घ्यावा. शेतकरी www.pmfby.gov.in या पोर्टलवर थेट ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
ई-पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची:
विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास, ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीकच अंतिम गृहीत धरण्यात येईल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
जिल्ह्यासाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ची नियुक्ती करण्यात आली असून, कोणत्याही माहिती किंवा तक्रारीसाठी supportagri@iffcotokio.co.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या खरीप पिकांना सुरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.




