
सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; सकारात्मक तोडग्याचे आश्वासन

सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानमंडळात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती केली होती.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ, खासदार नारायण राणे, तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उदय सामंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र शासन कायम ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.




