
मुंबईहून कोकणात पाठलाग; अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विवाहित आरोपी अटकेत
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुंबईतील एका विवाहित व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीचा शोध घेत कारवाई केली.
शुभम उतेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मृत मुलीच्या परिचयातील असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित १५ वर्षीय मुलगी ही मुंबईतील विलेपार्ले परिसरात कुटुंबासह राहत होती व उन्हाळी सुट्टीनिमित्त आपल्या मूळ गावी माणगाव तालुक्यात आली होती. आरोपीने तिचा मुंबईपासून कोकणापर्यंत पाठलाग केल्याचा संशय पोलिस तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
सोमवारी मध्यरात्री मुलीची हत्या झाल्यानंतर आरोपी पुन्हा मुंबईत परतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. बुधवारी सकाळी जंगल परिसरात मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाची मदत घेण्यात आली.
तपासादरम्यान, घटनेच्या रात्री पीडित मुलीने वडिलांच्या मोबाईलवरून केलेल्या शेवटच्या कॉलचा पोलिसांनी तांत्रिक तपास केला. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय शुभम उतेकर याच्यावर गेला. त्यानंतर विलेपार्ले येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा तपास अद्याप सुरू असून माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.




