
कपाळावर चंद्रकोर; येवल्यातील “बादशाह” बोकडाची सर्वत्र चर्चा
येवला तालुक्यातील भारम येथे एका खास बोकडाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकरी गजानन जेजुरकर यांच्या मालकीचा “बादशाह” नावाचा काळा बोकड आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरीत्या उमटलेली पांढरी चंद्रकोर हे त्याचे खास आकर्षण ठरले आहे. त्यामुळे “बादशाह”ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि पशुप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
दरम्यान, मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण जवळ आल्याने बाजारात बोकडांची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः कपाळावर चंद्रकोर किंवा वेगळ्या खुणा असलेल्या बोकडांना मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. अशा बोकडांना लाखो रुपयांच्या बोली लागल्याच्या चर्चाही रंगत आहेत.
“बादशाह”साठीही विशेष खुराक आणि देखभाल केली जात असून, या बोकडाला चांगली किंमत मिळेल, अशी अपेक्षा गजानन जेजुरकर यांनी व्यक्त केली आहे.




