
मुंबईतील मोकळी मैदाने वाचविण्यासाठी रविवारी तिरंगा मोर्चा; मनसेही सहभागी होणार- आदित्य ठाकरे!
मुंबई : मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या जागा खासगी संस्था भाजप नेत्यांना देण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामध्ये अंधेरील मैदानासह मुंबईतील आणखी दोन भूखंडांचा समावेश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत हे भूखंड देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील मोकळी मैदाने वाचविण्यासाठी वांद्रे येथील नेव्हील डिसुजा टर्फसमोर रविवारी तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात शिवसेनेसोबत मनसेही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मोकळी मैदाने हडपण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील एक मैदान आणि आणखी दोन भूखंड हे मुख्यमंत्री फडणवीस एका भाजपच्या आमदाराला भेट देणार आहेत. या भूखंडाची किंमत १० वर्षांपूर्वी साडेपाचशे कोटी होती, तर आज याची किंमत किती असेल, असा सवाल करताना मुख्यमंत्र्यांकडून हा भूखंड एका भाजपच्या आमदाराला २१ लाख रुपये प्रतिवर्ष इतक्या किमतीवर देत असून असे एकूण तीन भूखंड हे मुख्यमंत्र्यांच्या एका मित्राला म्हणजे एका खासगी संस्थेला देत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतील २२ बस डेपो असतील किंवा भूखंड हे मुख्यमंत्री फडणवीस स्वत:च्या मित्रांना देत असतील तर हा घोटाळा उघड दिसत आहे. पंतप्रधान मोदींचे या भ्रष्टाचाराकडे लक्ष आहे का, आम्ही याबाबत न्यायालयात गेलो आहोत, आता न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मोकळ्या मैदानांच्या खासगीकरणाचा भाजपचा डाव असून याविरोधात रविवारी संध्याकाळी ५ वाजता तिरंगा हाती घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. मोकळ्या जागा वाचवण्यासाठी नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, हा भूखंडचा घोटाळा थांबला पाहिजे. मुंबईसाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. या आंदोलनात मनसे नेते अमित ठाकरे हेही सहभागी होणार आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.




