चिपळूण बस स्थानकातून महिलेचे १४.६१ लाखांचे दागिने चोरणारी आरोपी महिला अटकेत


*चिपळूण येथील भोगाळे मध्यवर्ती बसस्थानकावर घडलेल्या तब्बल १४.६१ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिने चोरीप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मंगल उर्फ शोभा अंकुश साठे (६०, रा. खंडाळा, जि. सातारा) हिला चोरीच्या सर्व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
या संदर्भात वैष्णवी विश्वनाथ शिंदे (४७, रा. कावीळतळी, चिपळूण) यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या मुलीसह तिवरे गावी नातेवाईकांच्या लग्नासाठी जात असताना दुपारी सुमारे ३:२० वाजता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये गंठण, सोनसाखळ्या, हार, कर्णफुले आणि बांगड्यांचा समावेश होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला संशयास्पदरीत्या ऑटो रिक्षातून पसार होताना दिसून आली. त्यानुसार रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. चौकशीत संबंधित महिलेने फरशी तिथ्यावर उतरल्याचे आणि त्याच्या मोबाईलवरून एका व्यक्तीला कॉल केल्याचे समोर आले.

त्या कॉलच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आणि हा कॉल सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भाटघर येथील एका व्यक्तीला केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डीबी पथकाने थेट खंडाळा येथे जाऊन तपास केला. संबंधित व्यक्तीच्या मदतीने आरोपी महिलेच्या घराचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून फिर्यादी महिलेनेही दागिने ओळखले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button