
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर परिसरात एका वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर परिसरात एका वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी ७१ वर्षीय महिलेची सोन्याची चेन लंपास केली. विजया श्रीकृष्ण सरदेसाई (रा. नाचणे रोड, पावरहाऊस) यांनी याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजया सरदेसाई या दूध आणण्यासाठी आरोग्य मंदिर येथे जात होत्या. यावेळी हेल्मेट परिधान केलेले दोन इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी परिसरात खून व चोरी झाल्याचे सांगून सुरक्षेच्या कारणास्तव तुमच्या जवळील दागिने काढून जपून ठेवा, अशी बतावणी या तोतया पोलिसांनी केली. महिलेने विश्वास ठेवून गळ्यातील सोन्याची चेन काढली असता, त्या दोघांनी अत्यंत शिताफीने हातचलाखी करून ती चेन आपल्या ताब्यात घेतली आणि तिथून पळ काढला.




