
कृषी विभागांतर्गत चालवल्या जाणार्या फळरोपवाटिकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने यंदा ऐतिहासिक कामगिरी बजावली
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत चालवल्या जाणार्या फळरोपवाटिकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने यंदा ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, दालचिनी आणि काळीमिरी अशा दर्जेदार रोपांच्या विक्रीतून मोठा महसूल मिळवत राज्यातील १४५ फळरोपवाटिकांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील तर पोमेंडी-भाट्ये रोपवाटिकेने प्रथम क्रमांक तर झरेवाडी हातखंबा रोपवाटिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या एकूण ७ शासकीय फळरोपवाटिका कार्यरत आहेत.
या रोपवाटिकांमध्ये तयार होणारी दर्जेदार कलमे व रोपे प्राधान्याने स्थानिक शेतकरी आणि त्यानंतर इतर जिल्ह्यातील शेतकर्यांना उपलब्ध करून दिली जातात. पोमेंडी-भाट्ये फळरोपवाटिकेने रोपे आणि गांडूळ खत विक्रीतून ३१ लाख ८० हजार ३९५ रुपये तर झरेवाडी-हातखंबा फळरोपवाटिकेने २७ लाख ५३ हंजार २० रुपये इतके आर्थिक उत्पन्न गेल्या पाच महिन्यांमध्ये मिळवले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर स्थित असलेल्या झरेवाडी-हातखंबा फळरोपवाटिकेत यंदा काजूच्या प्रसिद्ध ’वेंगुर्ला’ जातीची तब्बल दीड लाख कलमे तयार करण्यात आली होती. त्यापैकी १ लाखांहून अधिक कलमांची यशस्वी विक्री झाली. तर ४५ हजार कलमे अद्याप उपलब्ध आहेत. याशिवाय, आंब्याची १२ हजार रोपे तसेच काळीमिरी व दालचिनीच्या रोपांनाही शेतकर्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.




