
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगमचा एक्सलन्स अॅंड मेरिट पुरस्कार जाहीर
*_रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगम या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळाचा को-ऑपरेटिव्ह एक्सलन्स अॅंड मेरिट हा पुरस्कार जाहिर झाला. या पुरस्काराचे वितरण येत्या बुधवारी (ता. १३) पुण्यात होणार आहे. प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आनंद व्यक्त केला.शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून सहकारातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना सन्मानित करण्यात येते. महामंडळातर्फे राष्ट्रीय स्तरावर सहकारातले अनेक उपक्रम राबवले जातात. या अनुषंगाने क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या सहकार क्षेत्रातल्या विभागाचा पुरस्कार स्वरूपानंद पतसंस्थेला जाहीर झाला आहे.अॅड. पटवर्धन म्हणाले की, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २०१३ राज्य सहकारचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले. आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने यातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्रस्तावाची छाननी करण्याकरिता प्रत्येक राज्याची समिती नेमली होती. गेल्या तीन वर्षांचा अहवाल, संस्थेचे सभासद, ठेवी, कर्जे, वसुली, सहकार क्षेत्रातील प्रमाणे आदी निकष लावले होते. त्यात संस्थेला पुरस्कार मिळाला. राज्याच्या सहकार आयुक्तांच्या समितीने छाननी केली होती. पुरस्काराचे वितरण १३ मार्चला सकाळी १०.३० वाजता पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट संस्थेत होणार आहे. त्यासाठी संस्थेतील १० प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. गेल्या वर्षीच्या ६ कोटी ६२ लाख नफ्यात वाढ होऊन यंदा निव्वळ नफा ७ कोटीच्या घरात पोहोचेल. ३२ वर्षे व्यवहारात, विश्वासार्ह पद्धतीने सेवा देत, ग्राहकांना संलग्न करत सातत्याने वाटचाल सुरू आहे. जनसामान्यांचा विश्वासासोबत आता केंद्र शासनानेही पुरस्काराची मोहर उमटवल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यामुळे अन्यही संस्था पुढे येतील, असेही अॅड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.*पतसंस्थेची आर्थिक स्थित भक्कम*स्वरूपानंद पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सध्या ठेवी ३०३ कोटी ९५ लाख रुपये, कर्ज २११ कोटी ७३ लाख, गुंतवणूक १४१ कोटी ९९ लाख, वसुलीचे प्रमाण ९९.३६ टक्के, खेळते भांडवल ३६२ कोटी ८ लाख, सी. डी. रेशो ५९.६९ टक्के व स्वनिधी ४२ कोटी २५ लाख आहे.www.konkantoday.com




