देवरुख-रत्नागिरी मार्गावर गव्याची धडक; दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

संगमेश्वर : देवरुख-रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका गव्याने धावत्या मोटारसायकलला धडक दिल्याची भीषण घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून देवरुख-साडवली परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळी संबंधित तरुण आपल्या मोटारसायकलवरून जात असताना आंबवजवळ जंगलातून अचानक एक गवारेडा रस्त्यावर धावत आला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाला मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि गव्याच्या जोरदार धडकेत दुचाकी रस्त्याकडेला फेकली गेली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने धाव घेतली असता तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून वन्यजीव विभागालाही याबाबत कळवण्यात आले आहे. या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button