
रत्नागिरीच्या आरोग्यसेवा सक्षमीकरणाला कृतीची जोड
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश!
◾आ.किरण भैय्या सामंत यांचाही पाठपुरावा !
◾पहिल्याच दिवशी डेंग्यूग्रस्त रुग्णाला मिळाला दिलासा
रत्नागिरी : एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारपणाशी झुंज देत असताना तिच्या उपचारांसाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत वेळेवर मिळणे, ही त्या कुटुंबासाठी मोठी आशा असते. विशेषतः डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेट्सची आवश्यकता निर्माण झाल्यास रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि मनातील चिंता मोठी असते. अशाच परिस्थितीत रत्नागिरीतील आरोग्यसेवेने माणुसकी आणि तत्परतेचा एक दिलासादायक अनुभव दिला आहे.
उद्योग, गुंतवणूक व सेवा, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या पुढाकारातून रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तकेंद्रात (Blood Bank) प्लेटलेट्स अफेरेसिस मशीन पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या सुविधेची सुरुवातही माणुसकीचा आदर्श घालून देणारी ठरली. मशीन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रत्नागिरीतील श्री. पराग पाटील यांनी स्वतःहून पुढे येत SDP (Single Donor Platelets) साठी रक्तदान केले. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दानातून संकलित करण्यात आलेल्या प्लेटलेट्स दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी चिंतामणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डेंग्यूग्रस्त रुग्ण प्रेरणा प्रशांत जाधव यांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वेळेवर प्लेटलेट्स मिळाव्यात, यासाठी रक्तकेंद्रातील अफेरेसिस मशीन तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. या सूचनांची दखल घेत प्रशासनाने मशीन पुन्हा कार्यान्वित केले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली वैद्यकीय सुविधा पुन्हा उपलब्ध झाली आहे.
एका बाजूला आजाराशी झुंज देणारा रुग्ण, त्याच्या प्रकृतीची काळजी करणारे कुटुंबीय आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही अपेक्षेशिवाय मदतीसाठी पुढे आलेला रक्तदाता… या सगळ्यांमध्ये दुवा ठरली ती वेळेवर उपलब्ध झालेली आरोग्यसेवा. श्री. पराग पाटील यांनी दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता आणि वैद्यकीय यंत्रणेने केलेली तत्पर कार्यवाही यामुळे एका गरजू रुग्णाच्या उपचारांना मोलाची मदत झाली. या घटनेने रक्तदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून अनेक गावे आणि वाड्यावस्त्या दुर्गम भागात वसलेल्या आहेत. अशा परिस्थितीत गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध करून देणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील महत्त्वाचे आव्हान असते. विशेषतः डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्यास प्लेटलेट्सचा पुरेसा साठा आणि नियमित पुरवठा राखणे आवश्यक ठरते. SDP आणि RDP या रक्तघटकांची गरज रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार निश्चित केली जाते. त्यामुळे जिल्ह्यातच अफेरेसिस मशीनची सुविधा उपलब्ध असणे हे गरजू रुग्णांसाठी मोठे दिलासादायक पाऊल ठरु लागले आहे.
‘आरोग्यसेवा ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेली जबाबदारी आहे. आजारपणाच्या कठीण प्रसंगी रुग्णाला आवश्यक उपचार वेळेत मिळावेत आणि त्याच्या कुटुंबीयांची अनावश्यक धावपळ होऊ नये, यासाठी आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करणे हे आमचे प्राधान्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न केले जातील,’ अशी भूमिका पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.
रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सुविधा सक्षम करणे, जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेला बळकटी देणे आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अफेरेसिस मशीन पुन्हा सुरू होणे हा त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं डॉ. सामंत यांनी सांगितलं.
अफेरेसिस मशीनची ही सुविधा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणारे वैद्यकीय अधिकारी, रक्तकेंद्रातील कर्मचारी तसेच स्वेच्छेने प्लेटलेट्स दान करून सामाजिक बांधिलकी जपणारे पराग पाटील यांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी अभिनंदन केले.




