मूकबधिर विद्यार्थ्यांना साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मनाला आनंद देणारे- नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे

रत्नागिरी : मूकबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलात्मक आणि हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन मनाला आनंद देणारे आहे. या वस्तू वैविध्यपूर्ण असून मुलांच्या हातातील कला अविश्वसनीय आहे. या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या व आत्मीयतेने मुलांकडून या वस्तू करून घेणाऱ्या या शिक्षकांचेही कौतुक केले पाहिजे. रत्नागिरी नगरपालिकेतर्फे या विद्यार्थ्यांना लागणारी मदत नक्की करू, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी केले.

गाडीतळ येथील कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या दिवाळीनिमित्त ४१ व्या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, उपाध्यक्ष सौ. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे, व्यवस्थापिका सौ. प्रिती हातिसकर, माजी व्यवस्थापक शेखर लेले, मुख्याध्यापक गजानन रजपूत व माजी मुख्याध्यापिका सौ. अनुराधा ताटके, माजी शिक्षिका, शिक्षक, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते.

फित कापून व दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. सुर्वे यांनी केले. त्यांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सौ. सुर्वे यांचा सत्कार सौ. बोपर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन ४ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी विद्यार्थ्यांच्या कलेला दाद द्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी केले आहे.

या विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तूंना व त्यांच्या कलेला रत्नागिरीकरांकडून मिळेल. आता हे सगळं बघितल्यावर या मुलांमधली कला इतकी चांगली आहे की, एखादा अनेक प्रशिक्षणं घेतलेला माणूसही करू शकणार नाही, इतक्या चांगल्या वस्तू मुलांनी केल्या आहेत. शिक्षिका म्हणून माझ्या करिअरची सुरवात दि न्यू एज्युकेशन सोसायटीपासून केली आहे. त्यामुळे संस्थेशी ऋणानुबंध आहेत. विद्यार्थ्यांनी केलेलं उटणं, शोभेच्या वस्तू रत्नागिरीकरांनी घ्याव्यात तसेच आमचे नगरसेवकही भेट देऊन खरेदी करतील, असे सौ. सुर्वे यांनी या वेळी सांगितले.
या प्रदर्शनात पारंपरिक आकाशकंदिल, लाकडापासून बनवलेली कलात्मक घड्याळे, मातीचे मावळे, पणत्या, टाकाऊतून टिकाऊ शो पीस, उटणे, शुभेच्छापत्रे अशा अनेक वस्तू आहेत.

प्रदर्शनानिमित्त सभागृहात विद्यार्थ्यांनी संस्कार भारतीची २० बाय १० फुटांची रंगावली साकारली आहे. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहून पाणी वाचवा संदेश देणारे फलकही शाळेत झळकले आहेत. या माध्यमातून शाळेने येणाऱ्या सर्व ग्राहकांना पाणी वाचवण्यासाठी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button