लोटे येथे भरधाव इर्टिगा कारची पादचारी महिलेला धडक; ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी

एच.पी. पेट्रोलपंपासमोरील अपघात; ६४ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील एच.पी. पेट्रोलपंपासमोर भरधाव इर्टिगा कारने धडक दिल्याने ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.
या अपघातात शांताबाई निगाभा वालीकर (वय ५५, सध्या रा. लोटे माळवाडी, ता. खेड, मूळ रा. विजापूर जिल्हा) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीराच्या इतर भागांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी चंदामा क्येनर्या पुजारी (वय ५४, व्यवसाय कंत्राटदार, रा. लोटे माळवाडी) हे आपल्या कामगार शांताबाई वालीकर आणि त्यांच्या पत्नीसोबत कामावरून घरी पायी जात होते. पटवर्धन लोटे येथील एच.पी. पेट्रोलपंपासमोरील रस्ता ओलांडत असताना शांताबाई रस्ता क्रॉस करीत होत्या. त्याचवेळी चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या मारुती इर्टिगा कारने (क्र. एमएच ४७ एएन २२८४) त्यांना जोरदार धडक दिली.
कारचालक अशफाक इस्माईल मोगल (वय ६४, रा. एस.टी. कॉलनी, हिरा अपार्टमेंट, रत्नागिरी) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button