
किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीला मोठे भगदाड; संवर्धनाबाबत शिवप्रेमींमध्ये चिंता
जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळालेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीला मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दुसऱ्या बुरुजाजवळील तटबंदीच्या पाव्याच्या ठिकाणी सुमारे तीन मीटर रुंदीचे भगदाड निर्माण झाल्याने किल्ल्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या भागातील तटबंदीचे दगडही निखळल्याने संरचनेची मजबुती कमी झाल्याचे दिसून येत आहे. ऐतिहासिक वास्तूचे नुकसान होत असल्याने किल्ला रहिवासी, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
किल्ले सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा ठेवा असल्याने पुरातत्त्व विभागाने तातडीने या तटबंदीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व संवर्धनाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.




