
एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक; २०,७०० रुपये लंपास
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात एका ७२ वर्षीय वृद्धाची मदत करण्याचा बहाणा करून अज्ञात भामट्याने त्यांच्या खात्यातून २० हजार ७०० रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिताराम तुकाराम लांबे यांच्या तक्रारीवरून सावर्डे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, १६ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता सिताराम लांबे हे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देण्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने लांबे यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले आणि पासवर्ड पाहून घेतला. त्यानंतर हातचलाखी करत मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवले आणि त्याऐवजी दुसरे कार्ड लांबे यांना देऊन तो तेथून निघून गेला.
काही वेळातच आरोपीने चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून लांबे यांच्या खात्यातून २० हजार ७०० रुपये काढले. मोबाईलवर व्यवहाराचा संदेश आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लांबे यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडे एटीएम कार्ड किंवा पासवर्ड देऊ नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.



