डिजिटल पीक पाहणीत मुरादपूर गावाची बाजी; १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण

संगमेश्वर तालुक्यातील पहिले गाव; १,२८२ सर्वेक्षण प्लॉटची नोंदणी पूर्ण

देवरूख : केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS MH) मोबाईल ॲपद्वारे खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुरू असलेल्या डिजिटल पीक पाहणी मोहिमेत संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर गावाने १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गावातील एकूण १,२८२ सर्वेक्षण प्लॉटची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, या कामगिरीबद्दल महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डिजिटल पीक नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक गट क्रमांक आणि सर्वे क्रमांकानुसार प्रत्यक्ष शेतातील पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून क्रॉप रजिस्ट्री अद्ययावत केली जात आहे.

या नोंदींचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा भरपाई, आपत्ती व्यवस्थापनातील मदत, कृषी सांख्यिकी आणि ॲग्रीस्टॅक प्रकल्पासाठी होणार आहे. त्यामुळे पीक पाहणीची अचूक आणि वेळेत नोंदणी करणे महत्त्वाचे ठरत आहे.

मुरादपूर गावातील एकूण १,२८२ सर्वेक्षण प्लॉटची पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी पीक पाहणी सहाय्यक तथा महसूल सेवक प्रथमेश गांगण यांनी विशेष मेहनत घेतली. अडचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. ग्राम महसूल अधिकारी जयश्री पाटील आणि देवरूखचे मंडळ अधिकारी रोहित पाठक यांचेही या कामात मोलाचे योगदान लाभले.

संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

१० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन

संगमेश्वर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतांची पीक पाहणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. डिजिटल पीक नोंदणीमुळे शेतातील पिकांची अधिकृत माहिती अद्ययावत होणार असून, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठीही ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button