
सुधारित मसुद्याला मंजुरी; मतदारसंघ फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत!
नवी दिल्ली : महिला आरक्षणाशी जोडण्यात आलेल्या लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या सुधारित मसुद्यानुसार, प्रत्येक राज्यामध्ये लोकसभेच्या जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढवल्या जातील. त्यामुळे संसदेमध्ये लोकसभेच्या जागा ८५० होणार आहेत. हे विधेयक ३० डिसेंबर रोजी लोकसभेत तर, २ डिसेंबर रोजी राज्यसभेत मांडले जाणार असून त्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे.
लोकसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू असून द्रमुक, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांशी पाठिंबा देण्यासाठी चर्चा केली आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ नये यासाठी इंडिया आघाडीनेही धावपळ सुरू केली असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक बोलावली आहे. यामध्ये द्रमुक, आप आणि बिजु जनता दल या इंडिया आघाडीत नसलेल्या पक्षांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.
या मसुद्यामुळे जनगणनेच्या आधारावर लोकसभा मतदारसंघांची संख्या आणि फेररचना करण्यापासून फारकत घेण्यात आली आहे. २०११च्या जनगणनेनुसारच लोकसभेच्या जागांमध्ये वाढ व फेररचनाही केली जाणार आहे. नव्या विधेयकानुसार विद्यमान संख्येत ३०७ जागांची भर पडणार आहे. एकूण ८५० जागांपैकी ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील आणि हे आरक्षण २०२९च्या लोकसभा निवडणुकीमध्येच लागू केले जाणार आहे. त्यामुळे १९ व्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या २८१ होईल.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एप्रिलमध्ये, आठ महिन्यांपूर्वी विरोधकांच्या एकजुटीमुळे हे घटनादुरुस्ती विधेयक फोल ठरले होते. त्यानंतर केंद्र सरकारने ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांशी पाठिंब्यासाठी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पुन्हा नामुष्कीला सामोरे जावे लागू नये म्हणून अत्यंत सावध पावले टाकली गेली होती. केंद्र सरकारला दोन तृतीयांश संख्याबळासाठी ३६० सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. केंद्र सरकारने प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व द्रमुक या दोन पक्षांशी संपर्क साधला होता.
या दोन्ही पक्षांनी ५० टक्के जागा वाढवण्याच्या अटीवर पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. त्यांच्या मागणीनुसार नव्या विधेयकाच्या मसुद्यामध्ये केंद्र सरकारने या अटीचा समावेश केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे ८ व द्रमुकचे २२ खासदार सुधारित विधेयकाला पाठिंबा देतील, असा विश्वास केंद्र सरकारला वाटतो. विधेयकाच्या संमतीसाठी दोन तृतीयांश संख्याबळ असल्याची खात्री असल्यानेच केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधेयकाविरोधात ‘इंडिया’ आघाडीत धावपळ; मित्रपक्षांना जोडून ठेवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न; ‘द्रमुक’, ‘आप’, ‘बीजेडी’लाही बैठकीचे आमंत्रण
संख्याबळाबाबत केंद्र निश्चिंत
लोकसभेत सत्ताधारी रालोआ आघाडीकडे भाजपसह (२४१) एकूण ३२० सदस्यांचे संख्याबळ आहे. विधेयक संमत करण्यासाठी ३६० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (८), द्रमुक (२२), वायएसआर काँग्रेस (४) यांचा पाठिंबा मिळाला तर संख्याबळ ३५४ पर्यंत जाऊ शकते. म्हणजे केंद्र सरकारला आणखी ६ सदस्यांची पाठिंब्यासाठी गरज असेल. मात्र कुठल्याच आघाडीत नसलेला आम आदमी पक्षाकडे ३ खासदार आहेत, त्यांनी मतदानात भाग घेतला नाही आणि इतर छोटे पक्षांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचे ठरवले तर आवश्यक संख्याबळ केंद्र सरकारला जमवता येईल असे मानले जात आहे. या अंकगणिताच्या आधारे केंद्र सरकारने घटनादुरुस्ती विधेयक संमत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सुधारित मसुद्यात काय?
- प्रत्येक राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढवल्या जातील.
- संसदेमध्ये लोकसभेच्या जागा ८५० होणार असून ही जागांची संख्या पुढील २५ वर्षे म्हणजे २०५१ पर्यंत कायम ठेवली जाईल.
- एकूण ८५० जागांपैकी ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.
महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांची संख्या ७२?
- प्रत्येक राज्यात सध्याच्या मतदारसंघांच्या संख्येत ५० टक्के वाढ करण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्याने घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास राज्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ७२ होईल.
- राज्यात लोकसभेचे सध्या ४८ मतदारसंघ आहेत. प्रत्येक राज्यातील प्रचलित मतदारसंघांच्या संख्येत ५० टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. तसे प्रसिद्ध पत्रक केद्र सरकारने जारी केले.
- नवीन रचनेत मुंबईतील मतदारसंघांची संख्या दोनने वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरी भागातील मतदारसंघांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते.




