
बालविवाहमुक्त जिल्ह्यासाठी रत्नागिरीत विशेष जनजागृती मोहीमशाळा, झोपडपट्टी व मच्छीमार वस्त्यांमध्ये बालहक्क आणि बालविवाह निर्मूलनाबाबत मार्गदर्शन

रत्नागिरी, दि. २६ ) : बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असून, तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बालहक्क सप्ताह व बालविवाह निर्मूलन विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
बालविवाहामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतो. तसेच सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या त्यांच्या अधिकारांवरही गदा येते. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
या मोहिमेंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी माने इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी, २१ नोव्हेंबर रोजी साळवी स्टॉप झोपडपट्टी येथे पालक व बालकांसाठी, २३ नोव्हेंबर रोजी दादासाहेब सरफरे विद्यालय, मुरंबी, ता. संगमेश्वर येथे विद्यार्थ्यांसाठी, तर २४ नोव्हेंबर रोजी फिशरीज स्कूल, राजीवडा, रत्नागिरी येथे समुदायासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये मुला-मुलींचे विवाहाचे कायदेशीर वय, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील तरतुदी, बालकांचे मूलभूत हक्क, संरक्षण आणि सुरक्षितता या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाह रोखण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही करण्यात आले.
संकटग्रस्त व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना मदत करणे आणि बालविवाह रोखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ किंवा जवळच्या पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ च्या माध्यमातून संकटग्रस्त बालकांना उपलब्ध होणारी मदत तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरीचे मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
000




