आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय ही शांतपणे विचार करण्याची गोष्ट : गौतमी महाजन

' अर्थसंवाद ' व्याख्यानात दिला कानमंत्र

सिंधुदुर्गनगरी : कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय ही शांतपणे, घाई न करता, गुंतवणूक सल्लागाराला उलटसुलट प्रश्न विचारुन, पूर्ण माहिती घेऊन, विचारांती करण्याची गोष्ट आहे. असे केले तर पश्चातापाची वेळ येत नाही, असा कानमंत्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंधुदुर्गनगरी शाखेच्या व्यवस्थापक गौतमी महाजन यांनी दिला.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ सेवाभावी संस्थेने ‘अर्थसंवाद’ सदराखाली आयोजित केलेल्या ‘सुरक्षित गुंतवणूक, आर्थिक साक्षरता आणि सायबर सुरक्षा’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात दीड तासाहून अधिक काळ झालेल्या या संवादात श्रीमती महाजन यांनी श्रोत्यांच्या असंख्य प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले. ‘घुंगुरकाठी’च्या सचिव डॉ. सई लळीत यांनी ग्रंथभेट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अध्यक्ष सतीश लळीत यांनी श्रीमती महाजन यांचा परिचय करुन देत व्याख्यानाच्या आयोजनाचे उद्दिष्ट सांगितले.
श्रीमती महाजन यांनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत गुंतवणुकीचे विविध प्रकार आणि पर्याय, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सुरक्षित गुंतवणुकीसाठी असलेल्या पीपीएफसारख्या अनेक सरकारी योजना, क्रेडिट कार्ड, विमासंलग्न योजना, जनरल बँकींग आणि ऑनलाईन व्यवहार करताना घ्यायची काळजी, सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीचे प्रकार याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. कष्टपूर्वक मिळविलेला पैसा गुंतवताना कोणकोणत्या काळजी घेणे आवश्यक आहे, याबद्दल त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
पैसे गुंतवायचे म्हणजे सर्वसामान्य माणूस मुख्यत: आवर्ती ठेव (आरडी) किंवा मुदत ठेव (एफडी) या पारंपरिक गुंतवणुकीचा विचार करतो, असे सांगून श्रीमती महाजन म्हणाल्या की, या दोन्ही गुंतवणुका सुरक्षित असल्या तरी त्यांचा परतावा तुलनेत कमी आहे. त्याऐवजी शेअर, म्युच्युअल फंड, विमासंलग्न योजना या तुलनेत अधिक परतावा देतात. शेअर्सचा पर्याय हा पूर्णवेळ अभ्यासाचा, काहीसा किचकट पर्याय असल्याने त्याबाबत अपुऱ्या अभ्यासाने उत्साह दाखवणे जोखमीचे ठरु शकते. अशा बाबतीत म्युच्युअल फंडचा पर्याय योग्य ठरतो. मात्र यासाठी गुंतवणूक सल्लागार निवडताना खुप काळजी घेणे आवश्यक असते. लघु, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे पर्याय, कमी, मध्यम आणि जास्त जोखमीचे पर्याय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अतिशय सुरक्षित अशा शासकीय योजनांची माहिती देताना त्या म्हणाल्या की, पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही सर्वाधिक लाभ देणारी पूर्णपणे करमूक्त योजना आहे. पालकांनी आपल्या मुलांसाठी ही योजना घेऊन नियमित गुंतवणुक केल्यास मुलांचे शिक्षण, विवाह यासाठी मोठा हातभार लागतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) यासारख्या अल्प गुंतवणुकीच्या, पण मोठे फायदे देणाऱ्या योजनांचे बारकावे त्यांनी सांगितले.
आजकाल बँकांच्या ॲपद्वारे, नेटबँकिंगद्वारे किंवा क्युआर कोड स्कॅनकरुन युपीआयद्वारे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. यासाठी होणाऱ्या मोबाईलच्या वापरातील संभाव्य धोके त्यांनी विशद केले. ऑनलाईन बँकिंग सुविधा असलेला मोबाईल हा तिजोरीप्रमाणे आहे. तिजोरीच्या चाव्या आपण जशा कुणाकडेच देत नाही, त्याप्रमाणे मोबाईल हँडसेट कोणाकडेही, अगदी मुलांकडेही सोपवणे किती धोकादायक आहे, हे त्यांनी सोदाहरण सांगितले. कोणतेही ॲप डाऊनलोड करताना प्लेस्टोअर किंवा ॲपस्टोअरवरुनच करावे. कोणत्याही लिंकद्वारे येणारे ॲप चुकूनही वापरु नये. अशा लिंक त्वरित डिलिट कराव्यात. आपल्या खात्यात काही घोटाळा झाल्याची शंका आल्यास काय काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी अनेक सुचना केल्या. शेवटी डॉ. सई लळीत यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button