
पाचेरीसडा येथे बंद घरात बिबट्या आढळला; उपचाराआधीच मृत्यू
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथे बंद घराच्या पडवीत अशक्त अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रात्रभर बंद घरात अडकून राहिलेल्या या बिबट्याचा आज (१२ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. प्राथमिकदृष्ट्या उपासमारीमुळे त्याची प्रकृती खालावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाचेरी सडा हा गुहागर तालुक्यातील अत्यंत ग्रामीण भाग असून या परिसरात मानवी वस्तीही तुलनेने विरळ आहे. दरम्यान, वाडीतील ग्रामस्थांना बंद घराच्या पडवीत बिबट्या असाहाय्य आणि अशक्त अवस्थेत आढळून आला. अचानक बिबट्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बिबट्याची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. रात्रभर बंद जागेत राहिल्याने त्याला काहीही खाता आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आवश्यक तपासणी करण्यात येत आहे. बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याबाबतचा अंतिम अहवाल तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.




