
लांजानंतर आता रत्नागिरीत बनावट चेकचा गंडा; महागडा मोबाईल लांबवला
६६ हजार ५०० रुपयांचा बनावट चेक; सराफाकडूनही चांदीचा दिवा घेतल्याचे उघड, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध सुरू
रत्नागिरी : महागड्या वस्तू खरेदी करून त्याबदल्यात हुबेहूब बनावट चेक देत व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याने रत्नागिरी शहरात धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. शहरातील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स शोरूममधून ६६ हजार ५०० रुपयांच्या वस्तूंची खरेदी करून बनावट चेक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच व्यक्तीने एका सराफाकडूनही बनावट चेकद्वारे सुमारे ९ हजार रुपयांचा चांदीचा दिवा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने शोरूममध्ये येण्याच्या आदल्या दिवशी फोन करून टीव्हीबाबत सविस्तर चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी तो शोरूममध्ये आला आणि टीव्ही तसेच मोबाईल फोनची खरेदी केली. या वस्तूंचे एकूण बिल ६६ हजार ५०० रुपये झाले. त्याने त्याबदल्यात बँकेचा चेक दिला.
“टीव्ही पाली येथील माझ्या घरी पाठवून द्या, मोबाईल मी सोबत घेऊन जातो,” असे सांगून त्याने दुकानदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दुकानदाराने सुमारे ४९ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल त्याच्या ताब्यात दिला, तर सुमारे १८ हजार रुपयांचा टीव्ही नंतर घरी पाठवण्याचे ठरले.
मात्र, दुकानदाराने संबंधित चेक बँकेत जमा केल्यानंतर तो चेक स्कॅन होत नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. अधिक तपासणी केली असता चेक मूळ बँकेचा नसून त्याची हुबेहूब प्रिंट काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित चेक बनावट असल्याचे समोर आले.
सराफालाही अशाच पद्धतीने गंडा
या चेकबाबत बँकेत चौकशी केली असता आणखी एक प्रकार उघडकीस आला. शहरातील एका सराफाने याच व्यक्तीचा चेक क्लिअरिंगसाठी बँकेत पाठवला होता. तो चेकही स्कॅन न झाल्याने बँकेने परत केला होता. चौकशीअंती या व्यक्तीने सराफाकडूनही सुमारे ९ हजार रुपये किमतीचा चांदीचा दिवा बनावट चेक देऊन खरेदी केल्याची माहिती समोर आली.
दुसऱ्या दुकानदाराची सतर्कता; फसवणूक टळली
मोबाईल आणि टीव्ही खरेदी केल्यानंतर या इसमाने शहरातील आणखी एका दुकानात जाऊन चेकच्या माध्यमातून वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित दुकानदाराने चेक खात्यात जमा होऊन क्लिअर झाल्यानंतरच वस्तू देण्यात येईल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या इसमाचा प्रयत्न फसला आणि तो तेथून निघून गेला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच पद्धतीने लांजा येथील एका व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा व्यापारी वर्गात सुरू आहे. या चर्चेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
प्रकार लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या दुकानदाराने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. रत्नागिरी शहर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयिताचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, अनोळखी ग्राहकांकडून चेक स्वीकारताना व्यापाऱ्यांनी अधिक दक्षता बाळगावी आणि चेक प्रत्यक्ष खात्यात जमा होऊन क्लिअर झाल्यानंतरच महागड्या वस्तू ग्राहकाच्या ताब्यात द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे




