‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत लांजात ६ ऑक्टोबरला वीर माता-पिता, वीर नारी व माजी सैनिकांचा मेळावा पेन्शन व महासैनिक पोर्टल नोंदणीसह विविध अडचणींचे होणार जागेवरच निराकरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे माजी सैनिक व वीर परिवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. १ ) : ‘सेवा संकल्प अभियाना’चे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने वीर माता-पिता, वीर नारी आणि माजी सैनिकांच्या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता तहसीलदार कार्यालय, लांजा येथील सभागृहात पार पडणार आहे.
या मेळाव्यात माजी सैनिकांच्या पेन्शनविषयक समस्या, अभिलेख कार्यालयाशी (Record Office) संबंधित बाबी, ‘महासैनिक’ पोर्टलवरील नोंदणी यांसह विविध प्रशासकीय अडचणींचे थेट निराकरण करण्यात येणार आहे.
मेळाव्याला येताना माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने डिस्चार्ज बुक, पी.पी.ओ. (PPO) प्रत, ओळख पुरावे (आधार कार्ड, पॅन कार्ड), बँक पासबुक, ई.सी.एच.एस. (ECHS) कार्ड तसेच आधार कार्डशी जोडलेला (लिंक असलेला) मोबाइल फोन यांचा समावेश आहे.
लांजा तालुका व परिसरातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता व वीर पित्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button