आंजणारी पूल अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू!

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नजिक असलेल्या आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास सोळा चाकी ट्रक आणि खाजगी लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मालवण तालुक्यातील आडवली तांबळवाडी येथील रघुवीर उर्फ किरण बाळकृष्ण मसुरकर (वय ३५) या तरुणाचे उपचारादरम्यान शनिवारी सकाळी रत्नागिरी येथील रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या या अकाली व दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण आडवली पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

▪️अपघातात गंभीर जखमी

विरार येथून प्रवाशांना घेऊन मालवणच्या दिशेने निघालेली खाजगी लक्झरी बस शुक्रवारी पहाटे लांजा नजिकच्या आंजणारी पुलावर आली होती. याच वेळी पाठीमागून ग्रॅनाईट आणि महिंद्रा कंपनीचे साहित्य घेऊन गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या सोळा चाकी ट्रकने लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकने बसला दोनदा धडक दिल्याने बस महामार्गावर पलटी झाली आणि तब्बल २०० मीटरपर्यंत फरपटत गेली. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांमधील चालकांसह २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनीही शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलवले.या भीषण अपघातात रघुवीर उर्फ किरण मसुरकर यांच्या पोटाला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button