
कातळशिल्पांचा वारसा जपण्याचा ‘घुंगुरकाठी’ आणि ग्रामस्थांचा उपक्रम आशादायक: उमेश कुलकर्णी
घुंगुरकाठी आयोजित कुडोपी कातळशिल्प स्वच्छता मोहिमेला कुलकर्णींची उपस्थिती
सिंधुदुर्गनगरी : कातळशिल्पांसारखा प्राचीन आणि अमोल मानवी वारसा जपण्यासाठी ‘घुंगुरकाठी’ संस्थेने घेतलेला पुढाकार आणि त्याला कुडोपीच्या ग्रामस्थांचे मिळालेले सहकार्य ही खुप आशादायक गोष्ट आहे. आपला वारसा जपण्यासाठी केलेला स्वच्छता मोहिमेचा हा उपक्रम खुप महत्वाचा आहे, अशा शब्दात ‘वळु’, ‘देऊळ’ यासारख्या चित्रपटांचे प्रख्यात दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कुडोपी सड्यावरील कातळशिल्प स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेने यावर्षीही कुडोपी ग्रामस्थांच्या सहकार्याने कातळशिल्प स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत श्री. कुलकर्णी पूर्ण दिवस उपस्थित होते. ‘घुंगुरकाठी’चे सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत बुधवळे – कुडोपी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पडवळ, कुडोपी गावातील हेमंत पडवळ, बाळकृष्ण पडवळ, गुरुप्रसाद मयेकर, राजेंद्र हिर्लेकर, दत्ताराम वाळवे, हर्ष पडवळ, सिद्धीविनायक हिर्लेकर, अक्षय घाडी, श्लोक घाडी, गौरव अपराज, सोहम वाळवे या युवकांनी सहभाग घेतला.
उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर सनत गानू, स्मिता तावरे यांनीही सहभाग घेतला. श्री. कुलकर्णी म्हणाले की, एक चित्रपट दिग्दर्शक, निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी म्हणून मला कोकणचा निसर्ग, समाजजीवन, संस्कृती, परंपरा, वारसा याबद्दल सतत कुतुहल आणि आकर्षण वाटत आले आहे. इथली प्राचीन मंदिरे, देवराया प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षात या प्रदेशात सापडलेली अश्मयुगीन कातळशिल्पे हाही माझ्या कुतुहलाचा विषय आहे. ही पाहून एक समृद्ध वारसा पाहिल्याचा आनंद झाला. हा वारसा जपण्याचे आणि तो लोकांपर्यंत पोचविण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
सकाळी दहा वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. पावसाळ्यात कातळशिल्पांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे कातळशिल्पांमध्ये माती भरते. यामुळे ती अस्पष्ट दिसतात. याठिकाणी भेट देणारे पर्यटक, संशोधक, अभ्यासक यांना तर पाहणे सोपे व्हावे, यासाठी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येते. सुरुवातीला कातळशिल्प संशोधक आणि महाराष्ट्र शासनाच्या कातळशिल्प पुनरावलोकन व निरीक्षण समितीचे सदस्य सतीश लळीत यांनी सहभागींना कातळशिल्पांची स्वच्छता करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सूचना दिल्या.
स्वच्छता करताना कातळशिल्पांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सुचना दिल्या. कुडोपी येथील ‘बावल्यांचे टेंब’ येथे तीन क्लस्टरमध्ये एकुण ९० कातळशिल्पे आहेत. त्यामधील वैविध्य, प्राणी, पक्षी, मासे, मानवाकृती, विविध भौमितिक आकृत्या यामुळे ‘युनेस्को’ने कुडोपी कातळशिल्प समुहाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केला आहे. या मानवी वारशाचे जागतिक महत्व लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अत्यंत कडक उन्हात सुमारे पाच तास चाललेली मोहिम दुपारी तीन वाजता संपली. डॉ. सई लळीत यांनी सर्व सहभागींचे आभार मानले. याठिकाणी पर्यटकांच्या माहितीसाठी एक फलकही लावण्यात आला.




