
सामायिक जागेच्या वादातून मारहाण; ठार मारण्याची धमकी
चिपळूणमधील ममता सेल्स कॉर्पोरेशनमधील घटना; नईम पिलपिले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण : सामायिक जागेच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत वायपरने मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील रंगोबा साबळे रोडवरील ममता सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात घडली. रविवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी नईम निसार पिलपिले (वय ५०, रा. मिरजोळी, चिपळूण) यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल इकबाल पिलपिले (वय ३८, रा. आयशा मंजिल, रंगोबा साबळे रोड, बाजारपेठ, चिपळूण) आणि नईम पिलपिले यांच्यात सामायिक जागेच्या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला.
या वादातून नईम पिलपिले यांनी शिवीगाळ करून वायपरने मारहाण केल्याचा आरोप साहिल पिलपिले यांनी तक्रारीत केला आहे. तसेच, सामायिक जागेचा विषय पुन्हा काढल्यास कुटुंबातील व्यक्तींना गाडीखाली घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.




