
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

गुहागर : सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे धाव घेतली आहे. गुहागरच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, संपूर्ण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेले होते.
समुद्रकिनाऱ्यावर वाळूचे किल्ले बांधण्यापासून ते वॉटर स्पोर्ट्स, हॉर्स रायडिंग अशा विविध साहसी आणि मनोरंजक ऍक्टिव्हिटीचा आनंद पर्यटक घेत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण समुद्रकिनाऱ्यावरील या आनंदोत्सवात सहभागी झाले आहेत.
येत्या दोन दिवसांतही सुट्ट्या असल्याने कोकणातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात कोकणातील पर्यटन व्यवसायालाही चांगलीच चालना मिळत आहे.




