
महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे विजय निश्चित -सुनील तटकरे
आगामी निवडणूक आम्ही महायुती म्हणून पूर्ण ताकदीने लढवत आहोत. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या पाठिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे भक्कम आशीर्वाद आहेत. महायुतीच्या या एकत्रित ताकदीमुळे आमचा एकतर्फी विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येथील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कोकण विधानपरिषदेच्या या मतदारसंघात् शिवसेनेची ताकद मोठी आहे, हे आम्ही नाकारत नाही. २०१८ ते २०२४ या काळात अनिकेत तटकरे यांनी प्रत्येक नियोजन
बैठकीला हजेरी लावून स्थानिक प्रश्न सोडवले आहेत. राजकारणात चर्चा, वाटाघाटी आणि काहीवेळा संघर्ष होत असतो. मात्र आता त्या चर्चावर पडदा टाकणे आवश्यक आहे. या मतदारसंघात कोणत्याही ’चमत्कारा’ला जागा नाही. इथे थेट ’नमस्कार’च आहे. जिल्हा परिषद निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलो असल्याने काही प्रश्नांवर मतमतांतरे असू शकतात. मात्र कोणत्याही नेत्यासोबत चर्चा करण्याची गरज भासल्यास मी स्वतः नक्कीच पुढाकार घेईन, आमच्यात कोणताही दुरावा असण्याचे कारण नाही. काही गैरसमज असल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com




