
अर्जुना नदीवरील पुलाला स्व. भाईसाहेब हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव
राजापूर,

: मुंबई-गोवा महामार्गावर अर्जुना नदीवर बांधण्यात आलेल्या राजापूरमधील सर्वाधिक उंचीच्या पुलाला राजापूरचे पहिले राज्यमंत्री दिवंगत ल. रं. तथा भाईसाहेब हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूर यांच्या सातत्यपूर्ण मागणीला यश आले असून, या ठरावाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी दिली.
स्व. भाईसाहेब हातणकर यांच्या कार्याची आठवण आणि त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणून अर्जुना नदीवरील या पुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर शाखेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत पुलाला स्व. भाईसाहेब हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
स्व. भाईसाहेब हातणकर हे राजापूर विधानसभा मतदारसंघातून राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषविणारे पहिले लोकप्रतिनिधी होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध राजकीय पक्षांकडून पाच वेळा विधानसभेत राजापूरचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात एकाचवेळी आठ खात्यांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. राजापूर तालुक्याच्या पायाभूत विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे.
तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये रस्ते, कॉजवे यांची उभारणी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अणुस्कुरा घाटाचा विकास असो किंवा गावखडी-पुर्णगड पुलाचे स्वप्न साकारण्याचा विषय असो, अनेक विकासकामांना त्यांनी चालना दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा विकसित होण्यास मोठी मदत झाली. त्यांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आजही नागरिक अनुभवत आहेत.
स्व. भाईसाहेब हातणकर यांची राजकीय कारकीर्द निस्वार्थी, निष्कलंक आणि भ्रष्टाचारविरहित राहिली. सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, साधी राहणी आणि विकासकामांबाबतची तळमळ यामुळे त्यांनी राजकारणात वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कुटुंबानेही हीच मूल्यपरंपरा आजपर्यंत जपली आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य आजच्या लोकप्रतिनिधींसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.
अशा या आदर्श लोकनेत्याच्या कार्याची आणि स्मृतीची कायमस्वरूपी जपणूक व्हावी, तसेच नव्या पिढीला त्यांच्या योगदानाची ओळख व्हावी, या उद्देशाने अर्जुना नदीवरील मुंबई-गोवा महामार्गाच्या पुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या मागणीवर चर्चा होऊन ठराव मंजूर झाला आहे. त्याची लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, असा विश्वास दीपक नागले यांनी व्यक्त केला.




