इतिहास जाणून घेण्यासाठी डोळस भटकंती आवश्यक

कातळशिल्पांचे ज्येष्ठ अभ्यासक सुधीर रिसबूड यांचे प्रतिपादन

रत्नागिरी उपकेंद्रात तीन महिन्यांच्या पुरातत्त्वशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप

रत्नागिरी : आपल्या परिसरातील ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी त्याविषयीचे ज्ञान आणि चिकित्सक निरीक्षणदृष्टी आवश्यक आहे. इतिहास हा केवळ पुस्तकांतून समजून घेण्याचा विषय नसून त्याच्या अभ्यासासाठी डोळस भटकंती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कातळशिल्पांचे ज्येष्ठ अभ्यासक सुधीर रिसबूड यांनी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने आयोजित तीन महिन्यांच्या ‘पुरातत्त्वशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या’ समारोप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात रत्नागिरी शहर व परिसरातील २२ अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी श्री. रिसबूड यांनी पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास केवळ ऐतिहासिक घटनांपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक पैलूंच्या आधारे उपयोजित मूल्यांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. सैद्धान्तिक ज्ञानाला प्रत्यक्ष क्षेत्रभेटी आणि निरीक्षणाची जोड मिळाल्यास अध्ययन अधिक परिणामकारक ठरते. इतिहासाचा अभ्यास हा केवळ भूतकाळ समजून घेण्यासाठी नसून भविष्यासाठी उपयुक्त ज्ञान मिळविण्याचेही साधन असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. ऐतिहासिक वारशाचे अध्ययन करण्याबरोबरच त्याचे जतन, संवर्धन आणि त्याविषयीची योग्य माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे ही अभ्यासकांची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे ज्ञानप्राप्तीची सुरुवात असून विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, चिकित्सक दृष्टी आणि मातृभाषेतील ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून आपला अभ्यास अधिक व्यापक करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अभ्यासक्रमाचे मुख्य समन्वयक व पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी अभ्यासक्रमाची उपयुक्तता विशद केली. तसेच या उपक्रमामुळे कोकणातील नवोदित इतिहास अभ्यासकांना मिळणारी प्रेरणा आणि पुरातत्त्वीय वारशाच्या अध्ययनासाठी उपलब्ध झालेली संधी यांचे महत्त्व मांडले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी पुरातत्त्वशास्त्राच्या अंतःशाखीय अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने मौखिक परंपरा, ग्रंथाधारित ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञानपरंपरा यांचे महत्त्व स्पष्ट करताना श्री. सुधीर रिसबूड यांच्यासारख्या अनुभवी अभ्यासकांचे योगदान विशेष महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरातत्त्वशास्त्राचा वास्तुशास्त्र, प्रतिमाशास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आणि संस्कृत वाङ्मयाशी असलेला परस्परसंबंध त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केला. विशेषतः शृंगेरी येथील विद्याशंकर मंदिरातील राशिस्तंभांचे उदाहरण देत प्राचीन भारतीय स्थापत्यामध्ये विविध शास्त्रांचा समन्वय कसा साधला गेला आहे, याचे विवेचन केले. एकाच ऐतिहासिक वस्तूचा विविध ज्ञानशाखांच्या आधारे अभ्यास करून तिचे वेगवेगळे पैलू उलगडणे आणि त्यातून शास्त्रीय निष्कर्षापर्यंत पोहोचणे, हेच या अभ्यासक्रमाचे खरे गमक असल्याचे डॉ. मराठे यांनी सांगितले. पुरातत्त्वीय अवशेषांच्या अध्ययनातून लुप्त झालेल्या प्राचीन ज्ञानपरंपरांची पुनर्रचना करण्याची शक्यता असल्याने भारतीय ज्ञानपरंपरेच्या संशोधनात पुरातत्त्वशास्त्राला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. अभ्यासक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समन्वयक, प्रशिक्षक आणि सहभागी अभ्यासकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशा अभ्यासक्रमांच्या आयोजनासाठी विश्वविद्यालय सकारात्मक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभ्यासक्रमातील सहभागी प्रा. सीमा वीर, श्री. श्रीराम बापट, सौ. शुभांगी मुळे, श्री. सुहास गेल्ये आणि कु. ओंकार आठवले यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांतून आणि विचारांतून उपस्थितांना नवी प्रेरणा मिळाली.

समारोप समारंभात अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कातळशिल्प अभ्यासक, निसर्ग अभ्यासक व पक्षीनिरीक्षक सुधीर रिसबूड, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, अभ्यासक्रमाचे मुख्य समन्वयक व पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे, उपकेंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच अभ्यासक्रमातील सहभागी विद्यार्थी व अभ्यासक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. स्वरूप काणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button