चिपळूण वालोपे खून प्रकरणाचा पाच दिवसांत छडा; संशयित कोल्हापुरातून जेरबंद, तपास पथकाला ३० हजारांचे बक्षीस


चिपळूण : शहरातील वालोपे परिसरात १६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात चिपळूण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे अवघ्या पाच दिवसांत आरोपीचा शोध घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पवन आंबेडे याला कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले असून, या कामगिरीबद्दल तपास पथकाला पोलीस अधीक्षकांकडून ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

१६ नोव्हेंबर रोजी वालोपे परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती डायल ११२ द्वारे चिपळूण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, एका पानटपरीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, तर घटनास्थळी रक्ताने माखलेला जांभा दगड पडलेला होता. या दगडाने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज तपासातून समोर आला. सुरुवातीला मृताची ओळख पटविणेही पोलिसांसमोर आव्हान होते. पुढील तपासात मृत तरुण नवनाथ बबन कांबळे (वय ३१, मूळ कडेगाव, जिल्हा सांगली) असल्याचे निष्पन्न झाले. तो चिपळूणमध्ये मामाकडे राहत होता.

घटनास्थळी आरोपीच्या शोधासाठी ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने तपासाची दिशा निश्चित करणे कठीण होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर देत परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी सुरू केली. रेल्वे स्थानक परिसरापासून महामार्गापर्यंत सुमारे ५० ते ७० कॅमेऱ्यांमधील दृश्यांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ३० ते ४० संशयितांचे कॉल डिटेल्स तपासून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या सलग तपासातून संशयिताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले.

चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासात सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील रहिवासी पवन आंबेडे याच्यावर संशय निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत कोल्हापुरात सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, आर्थिक व्यवहारांचा संबंध आणि अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

या कारवाईत उपनिरीक्षक आगाव, राजेश यादव, विकास निकम यांच्यासह शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोणताही ठोस प्रत्यक्ष पुरावा नसताना तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याची उकल केल्याने पोलिसांच्या तपासाला यश मिळाले असून, या कामगिरीची दखल घेत तपास पथकाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button