रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी : नवजात बालकांचे आरोग्य जपणे, बालमृत्यू कमी करणे आणि बालकांची निरोगी वाढ व सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने दि. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह २०२६ साजरा करण्यात येत आहे. यावर्षी सप्ताहाची संकल्पना “लहान बाळे, मोठी क्षमता : त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा” अशी आहे.
या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये नवजात बालकांचे संगोपन, स्तनपान, लसीकरण, पोषण, नियमित आरोग्य तपासणी आणि बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाबाबत जनजागृती व पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच SNCU/NICU मध्ये उपचार घेतलेल्या बालकांच्या आरोग्याचा नियमित पाठपुरावा करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि RBSK पथक यांच्या समन्वयातून गृहभेटी व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
नवजात बालकाला जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, सहा महिने केवळ स्तनपान देणे, कमी वजनाच्या बालकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कांगारू मदर केअर (KMC) पद्धतीचा अवलंब करणे आणि नियमित लसीकरण करणे आवश्यक आहे. बालकांमध्ये धोक्याची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
“नवजात बालकाला रुग्णालयातून घरी सोडल्यानंतरही त्याच्या आरोग्याची नियमित काळजी व पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक बालकाला योग्य काळजी आणि वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी पालकांनी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाचे पालन करावे,” असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button