पोफळीतील वीज मंडळाच्या वसाहतीत घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा डल्ला; सोन्याचे दागिने आणि १० हजारांची रोकड चोरीला

चिपळूण, ता. ३१ : तालुक्यातील पोफळी येथील वीज मंडळाच्या वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह २ लाख ९६ हजार ५६९ रुपयांचा ऐवज लंपास केला. २९ ऑक्टोबरच्या रात्री ते ३० ऑक्टोबरच्या सकाळदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोफळी येथील एमएसईबी कॉलनीतील न्यू क्लास-३ मधील सदनिका क्रमांक ९२/२ मध्ये वैभव वसंत सकपाळ (४१) हे वास्तव्यास आहेत. ते वरिष्ठ तंत्रज्ञ वर्ग-२ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी २९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ ते ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील ३१ ग्रॅम वजनाची सोन्याची लोटस चेन, तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील रिंगा, लक्ष्मी टॉप्स आणि १० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ९६ हजार ५६९ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सकपाळ यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. रहिवासी वसाहतीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button