
कळसवलीत शिकारीसाठी फिरणाऱ्या तिघांना ठासणीच्या बंदुकीसह पकडले!___राजापूर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअपसह २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
राजापूर पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अभियानांतर्गत गस्त घालत असताना कळसवली येथे विनापरवाना ठासणीच्या बंदुकीसह शिकारीसाठी फिरणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी पकडले. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बंदूक, शिकारीसाठी वापरण्यात येणारे टॉर्च आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अमित कृष्णा बाणे आणि योगेश नारायण बाणे (दोघेही रा. कळसवली) तसेच विजय काशिनाथ तरळ (रा. तरळवाडी, कळसवली) या तिघांविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी नितीन घोगले यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे.
मध्यरात्रीच्या गस्तीवेळी संशयित आढळले
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुक्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राजापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागांत रात्रीच्या वेळी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान राजापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील या सहकाऱ्यांसह ओणीमार्गे कळसवली परिसरात गस्त घालत होत्या. यावेळी बोलेरो पिकअप वाहनातून संशयास्पदरीत्या फिरणारे तीन जण आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे सिंगल नळीची जुनी वापरातील गावठी ठासणीची बंदूक आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारे टॉर्च आढळले.
संबंधितांकडे बंदुकीचा परवाना नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअप वाहन जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, सागर खंडागळे, पोलीस कर्मचारी नितीन घोगले, दीपक काळे, श्री. शिवणकर आणि श्री. जाधव यांनी ही कारवाई केली.
राजापूर पोलिसांनी मध्यरात्री गस्तीवेळी केलेल्या या कारवाईमुळे विनापरवाना शस्त्र बाळगून शिकारीसाठी फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.




