
रियाध विमानतळावरील हुतींच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू!
पीटीआय, रियाध/दुबई : येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील विमानतळावर केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यात सौदीच्या ‘सौदिया विमान कंपनी’च्या विमानाचेही नुकसान झाले.
अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील युद्ध अधिक तीव्र होत असताना हुतींच्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाच्या सुरक्षेपुढील आव्हान वाढले आहे. हल्ल्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी रियाधकडे जाणारी उड्डाणे रद्द केली. दरम्यान, सौदी अरेबियाने येमेनची राजधानी सना येथे हुतींच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
रियाधमध्ये रविवारपासून तेल क्षेत्रातील मंत्री, सरकारी अधिकारी आणि प्रमुख तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणारी जागतिक ऊर्जा परिषद होणार आहे. त्यापूर्वीच झालेल्या हल्ल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. इराणशी संबंध असलेल्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ले वाढविले असून, देशाचे हवाई क्षेत्र बंद पाडण्याची धमकी दिली आहे. हुतींनी ताइझ शहरात सरकारी सैन्याला घेरले आहे.
तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती
लाल समुद्र आणि त्याच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेली बाब अल-मंदेब सामुद्रधुनी या आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गांवर हुतींचे हल्ले सुरू आहेत. त्याच वेळी इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतुकीवर अंशतः निर्बंध आणल्याने आखाती देशांतून होणाऱ्या तेलपुरवठ्यावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या संघर्षाचे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
एअर इंडियाची सेवा स्थगित
भारतीय दूतावासाने सांगितले की, एअर इंडियाने शनिवारपर्यंत आपली सेवा स्थगित केली आहे. हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरजेनुसार घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.




