
राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
मॉन्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान जाणवत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनने महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातून माघार घेतली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग आणि राज्यातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, आता राज्यात तापमानाचा पारा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.




