
चिपळूण आधुनिक बसस्थानकाचे काम अद्यापही अपूर्णच, प्रवाशांची प्रतीक्षा कायम
रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती शहर म्हणून चिपळूणची ओळख आहे. शहरासह तालुक्यातील हजारो विद्यार्थी, कामगार, नोकरदार, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस्टी वाहतूक आजही जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र, याच प्रवाशांना सेवा देणारे चिपळूणचे मध्यवर्ती एस्टी बसस्थानक गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्बाधणीच्या प्रतीक्षेत आहे. २०१८ पासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले असले तरी, ’चिपळूणचे आगार-बसस्थानक अखेर पूर्ण कधी होणार?’ हा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.
बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू झाले की यंदा तरी पूर्ण होईल, अशी आशा प्रवाशांना वाटते. मात्र, काही काळ काम सुरू राहिल्यानंतर पुन्हा कामाला ब्रेक लागतो. निधीचा अभाव, प्रशासकीय अडचणी, अतिरिक्त निधीची गरज आणि निविदा प्रक्रियेसह विविध कारणांमुळे कामाची गती मंदावल्याचे सांगितले जाते परिणामी, या प्रकल्पाचा लांबलेला प्रवास प्रवाशांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे.
चोरीचा डाव उधळला; संगमेश्वर पोलिसांची सर्कता !
संगमेश्वर संगमेश्वर-देवरुख मार्गावर चोरीच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेत संशयितरीत्या वावरणार्या एका परप्रांतीय तरुणास संगमेश्वर पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली असून, पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरातील संभाव्य चोरीची घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोजकुमार रामप्रकाश (वय ३२, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. शास्त्री पूल परिसर, संगमेश्वर) हा तरुण संगमेश्वर-देवरुख मार्गावरील हनुमान मंदिराच्या आडोशाला सूर्यास्तानंतर अतिशय संशयास्पद स्थितीत फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. चोरी करण्याच्या इराद्यानेच तो त्या ठिकाणी दबा धरून बसल्याची पक्की खात्री पटल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत सोपान आटोळे यांनी तत्काळ कारवाई करीत फिर्याद नोंदविली.
या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी मनोजकुमार याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्थानिक नागरिकांमधून कौतुक होत आहे.




