
भोम शिर्के विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
चिपळूण : यशवंत शिक्षण संस्था, भोम संचालित महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मार्गदर्शिका सौ. युगंधरा म्हामुणकर यांनी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्तीनंतरचे बचावकार्य याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
शाळा, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, लोकवस्ती, रहदारीचे मार्ग तसेच शहरी व ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये सुरक्षितता कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता अपघात, भूकंप, पूर, आग, वादळ, वायुगळती, त्सुनामी तसेच रोगराई यांसारख्या आपत्तींच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या वतीने मार्गदर्शिका सौ. युगंधरा म्हामुणकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



