
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. संघमित्रा फुले यांची उपसंचालक पदावर पदोन्नती
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि समर्पित सेवेची दखल घेत त्यांची आरोग्य सेवेतील उपसंचालक या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीमुळे आरोग्य वर्तुळात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पदोन्नती निश्चित झाली असली तरी त्यांना अद्याप नवीन नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. राज्य शासनाकडून त्यांच्या पदस्थापनेचे अधिकृत आदेश लवकरच जारी केले जाणार आहेत.
डॉ. संघमित्रा फुले यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयात अधिक्षक म्हणून सेवा बजाविताना रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मनोरुग्णांवरील उपचारांसोबतच त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक नवनवीन आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबविले. रुग्णालय प्रशासनात शिस्त आणून सेवा अधिक तत्पर करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठेची पावती म्हणून त्यांची उपसंचालक पदावर निवड झाली आहे, त्यांच्या या यशाबद्दल सहकार्यांनी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच येत्या काही दिवसांतच सरकारकडून नियुक्तीचे आदेश काढले जातील आणि त्यानंतर त्या नव्या पदाचा पदभार स्वीकारतील.




