बिनविरोध’च्या नावाखाली ग्रामीण भागात दबावतंत्र म्हणजे लोकशाहीचा शुद्ध अपमान; प्रस्थापितांची हुकूमशाही मोडून काढणार! – युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

रत्नागिरी तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि प्रस्थापित नेत्यांकडून सुरू असलेले राजकारण म्हणजे लोकशाहीचा शुद्ध अपमान आहे. ‘बिनविरोध’ निवडणुकीचा खोटा आव आणून प्रत्यक्षात सत्तेच्या बळावर ग्रामीण भागातील तरुण, महिला आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा हा हुकूमशाही प्रयत्न असून युवासेना हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा कडक इशारा युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सत्ताधारी गटाच्या प्रमुख नेत्यांकडून मोजक्या गावकऱ्यांच्या बंद दाराआड बैठका घेतल्या जात आहेत. गावाच्या विकासाचे आणि एकोप्याचे कारण पुढे करून या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांवर मानसिक व राजकीय दबाव आणला जात असल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानंतर युवासेनेने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

मतदानाचा अधिकार नाकारणे हाच लोकशाहीचा अपमान!

या संदर्भात बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवण्याचा अधिकार ‘मतदानाच्या’ माध्यमातून दिला आहे. लोकशाहीचा आत्मा हा निवडणूक, स्पर्धा आणि गुप्त मतदानात असतो. मात्र, ग्रामीण भागात काही मोजके प्रस्थापित नेते एकत्र येऊन संपूर्ण गावांचा हा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याची संधीच मिळणार नसेल, तर हा लोकशाहीचा सर्वात मोठा अपमान आहे.”

तरुणांच्या आणि नव्या नेतृत्वाच्या गळचेपीचा डाव

प्रसाद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेवर घणाघाती आरोप करताना म्हटले की, “गाव बिनविरोध करण्यामागचा खरा हेतू गावांचा विकास नसून, सत्तेचे केंद्रीकरण करणे हा आहे. जेव्हा निवडणूक लोकशाही मार्गाने होते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना जनतेची भीती असते आणि त्यांना काम करावे लागते. परंतु, दबावाच्या बळावर बिनविरोध आलेल्या प्रतिनिधींमध्ये जनतेप्रती कोणतीही जबाबदारी राहत नाही. यामुळे गावागावांतील सुशिक्षित तरुण, कर्तबगार महिला आणि नवीन विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची राजकीय गळचेपी केली जात आहे. प्रस्थापितांना भीती आहे की, जर निवडणूक झाली तर गावातील तरुण त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.”

युवासेना ग्रामीण जनतेच्या पाठीशी; हुकूमशाही मोडून काढणार!”

गाव कोणा एका पक्षाच्या किंवा नेत्याच्या बापाची जहागीर नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला, तरुणाला भयमुक्त वातावरणात मतदानाचा आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार आहे. सत्ताधाऱ्यांनी जर पैशांचा आणि प्रशासकीय दबावाचा वापर करून ग्रामस्थांवर एकतर्फी निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर युवासेना शांत बसणार नाही. आम्ही स्वतः अशा गावांमध्ये जाऊन या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आवाज उठवू,” असा इशारा सावंत यांनी दिला.

…तर युवासेना मैदानात उतरणार!

तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुका या पूर्णपणे पारदर्शक आणि लोकशाही मार्गानेच झाल्या पाहिजेत. जर कुठेही कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला धमकावण्याचा प्रयत्न झाला, तर युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल आणि प्रस्थापितांची ही हुकूमशाही मोडून काढेल, असा इशारा शेवटी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button