
राजापूर तालुक्यात वनराई बंधारे उभारण्याची मागणी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजप तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर : तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने राजापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी तालुक्यातील सर्व नद्या, नाले व ओढ्यांवर तातडीने वनराई बंधारे उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन अशोक घुमे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाळ्यातील पाण्याचा योग्य प्रकारे साठा करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक नद्या, नाले आणि ओढ्यांमधून सध्या पाणी वाहून जात आहे. हे पाणी अडवून त्याचा साठा केल्यास आगामी काळात निर्माण होणारी पाणीटंचाई काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांवर वनराई बंधारे उभारून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याची आवश्यकता असल्याचे घुमे यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.
वनराई बंधाऱ्यांमुळे स्थानिक पातळीवर पाणीसाठा निर्माण होण्यासोबतच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. याचा फायदा पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठीही होणार असून, शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नद्या, नाले व ओढ्यांवर आवश्यकतेनुसार वनराई बंधारे उभारण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या कामासाठी आवश्यक मंजुरी देऊन संबंधित विभागांना तातडीने सूचना कराव्यात आणि वनराई बंधाऱ्यांची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी मोहन घुमे यांनी केली आहे. त्यांच्या निवेदनाची दखल घेत याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.



