
लांजा येथे बैलांची वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील दोघा व्यक्तींवर गुन्हा दाखल
लांजा : बोलेरो पिक अप गाडीतून बैलांना वेदना होतील अशा पद्धतीने दाटीवाटीने बांधून त्यांची वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील दोघा व्यक्तींवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही घटना मंगळवार मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी ६.४० वाजता लांजा दाभोळे मार्गावर कुरचुंब फाटा या ठिकाणी घडली होती.
या घटनेतील २ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी आणि २१ हजार रुपये किमतीचे दोन बैल असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यजित गंगाराम कोलापटे (वय २३, राहणार आंबा मनोली धनगरवाडी, तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर) आणि सुरेश धोंडीबा बरागडे (वय ३३, राहणार चांदोली तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर) हे दोघेजण आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच ०९- जीजे २८२५) मधून दोन बैल त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने दोरीने बांधून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा दाटीवाटी पद्धतीने गाडीच्या हौद्यामध्ये भरून त्यांना वायू विसर्जन होणार नाही अशा चारही बाजूने बंदिस्त करून, त्यांची चाऱ्या पाण्याची सोय न करता, त्यांची वैद्यकीय तपासणी न करता, प्रमाणपत्र न घेता त्यांना दुखापत होईल अशा पद्धतीने त्यांची वाहतूक करताना मंगळवारी सायंकाळी ६.४० वाजता लांजा दाभोळे रस्त्याने वाहतूक करत असताना आढळून आले होते.
याप्रकरणी सत्यजित कोलापटे आणि सुरेश बरागडे या दोघांवर प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१), (डी) (ई), (एफ), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे कलम ४७,४८,४९,५४, ५६ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६६/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत बैलांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप तसेच बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.




