
नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नथुराम गोडसेचे फलक!
नाशिक : शहरातील मुख्य गणेश विर्सजन मिरवणुकीत एका मंडळाने अखंड भारताचा संदेश देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरूजी, डॉ. के. बी. हेगडेवार यांच्यासोबत नथुराम गोडसे याचेही फलक झळकावल्याची बाब समोर आली.
शुक्रवारी सकाळी वाकडी बारव येथून शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगोरी आहेर-आडके यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. जवळपास १५ तासांहून अधिक काळ मिरवणूक चालली. अनेक मंडळांकडून आकर्षक, लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले. मिरवणुकीत शिवसेवा गणेश मंडळाच्या वतीने डमरू पथक सहभागी झाले होते. या पथकाने डमरू वादनासह विविध साहसी कसरती सादर केल्या. मुंबई नाका येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने श्री सप्तशृंगी मातेचा देखावा सादर करण्यात आला. श्री दंडे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने भव्य आकाराची हनुमानाची मूर्ती आणि तिच्या पाठीमागे चक्राकार फिरणारी गदा हा देखावा लक्षवेधी ठरला. गुलालवाडी व्यायामशाळेच्या वतीने लेझीमचे प्रात्यक्षिकासह अनेक साहसी कसरती सादर करण्यात आल्या. अन्य काही मंडळांकडून चित्तथरारक लाठी-काठी आणि शस्त्र कसरती सादर करण्यात आल्या. सरदार चौक मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेली बालाजीची मूर्तीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमला. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मिरवणुकीचा जल्लोष शिगेला पोहचला असतांना पोलीसांकडून येणारा दबाव पाहता नाशिक गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. होत असताना मिरवणुकीत अखेरच्या काही क्रमांकात असणाऱ्या भोईराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातात स्वातंत्र्यवीर सावरकर, माधव गोळवलकर, डॉ. के. बी. हेडगेवार यांच्यासोबत नथुराम गोडसे याचेही छायाचित्र असलेले फलक असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. ‘अखंड भारत, नो क्रॉम्प्रमाईज्ड’ असे काही मजकूर असलेले फलकही होते. मंडळाचे अध्यक्ष संदिप डहाके यांनी अखंड भारत तसेच सामाजिक प्रबोधनासाठी कार्यकर्त्यांनी फलक झळकावले असल्याचे सांगितले. भोईराज गणेश मंडळाचा मिरवणुकीत २१ वा क्रमांक होता. मंडळाला उशीर झाल्यामुळे जागचे हालता आले नाही, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.




