गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासियांची लूट खपवून घेतली जाणार नाही; रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे नियंत्रण- जिल्हाधिकारी मनुज जिंदल


*रत्नागिरी, दि. ११ :- मुंबई पुण्यावरुन रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासियांना रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जाते. उप प्रादेशिक परिवहन विभागाने यावर नियंत्रण ठेवावे आणि जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
आगामी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधिक्षक आरांक्षा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
शहरात रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रास होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, शहरातील फुटपाथ मोकळे करावेत आणि पकडलेल्या जनावरांच्या संवर्धनाबाबत योग्य नियोजन करावे. तसेच जड व अवजड वाहनांच्या परवानगीबाबत आणि रस्त्यावर ‘नो पार्किंग’ किंवा इतर महत्त्वाचे मार्गदर्शक फलक नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवात महावितरणने वीजपुरवठा खंडित होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी. गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन स्थितीत बोटींची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. विसर्जन मार्ग आधीच निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रामनाका ते विठ्ठल मंदिर या रस्त्यावर फळविक्रेत्यांनी गाड्या लावून अतिक्रमण केल्यामुळे तसेच दुचाकींच्या बेवारस पार्किंगमुळे पादचाऱ्यांना व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करून रस्ते मोकळे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
शांतता समितीच्या सदस्यांशी अधिक चांगला ताळमेळ राहावा यासाठी त्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात यावीत आणि त्यांच्यासाठी एक विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात यावा, जेणेकरून आपत्कालीन व आवश्यक माहितीची देवाणघेवाण जलद गतीने होऊ शकेल, अशा सूचनांही जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी दिल्या.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button