गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात वाद्यांची मागणी वाढली

महागाईचा वाद्यांनाही फटका; मृदंग, तबला, ढोलकी, नाल यांच्या खरेदीसह दुरुस्तीच्या कामांना वेग



राजापूर (राजेंद्र जोगळे) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या असून, गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. यामध्ये पारंपरिक वाद्यांनाही मोठी मागणी असून, शहरासह ग्रामीण भागात मृदंग, तबला, ढोलकी, नाल आदी वाद्यांची खरेदी तसेच दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे यंदा पारंपरिक वाद्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा धार्मिकतेसोबतच लोकपरंपरा, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध असतो. गणेशोत्सव म्हटला की आरती, भजन, जाखडी, कीर्तन यांच्यासोबत पारंपरिक वाद्यांचा नादही अविभाज्य भाग मानला जातो. टाळ-मृदंग, पखवाज, ढोलकी, तबला आदी वाद्यांच्या साथीने गणेशोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना रंगत येते. त्यामुळे गणेशोत्सव जवळ येताच या वाद्यांची मागणी वाढू लागते.
कच्च्या मालाच्या दरवाढीचा वाद्यांना फटका
वाद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा वाद्यांचे दरही वाढले आहेत. पूर्वी सुमारे ३५०० रुपयांना मिळणारा तबला आता चार हजार रुपयांहून अधिक किमतीला मिळत आहे. मृदंगाची किंमतही पूर्वीच्या सुमारे ३५०० रुपयांवरून चार ते साडेचार हजार रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ताल धरायला लावणारी ढोलकी सध्या साधारण अडीच ते तीन हजार रुपये किमतीला मिळत आहे.
नवीन वाद्यांच्या खरेदीबरोबरच जुन्या वाद्यांची दुरुस्ती करून घेण्याकडेही गणेशभक्तांचा कल आहे. चामडे बदलणे, पाती बसविणे, दोऱ्या दुरुस्त करणे, वाद्याचा आवाज व ताल पूर्ववत करणे आदी कामांना सध्या वेग आला आहे.
यंदा कीर्तन-भजनांचा स्वर अधिक घुमणार
गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा ओवसा आल्याने अनेक ठिकाणी कीर्तन-भजनांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह आहे.
टाळ-मृदंगाला ढोलकीची साथ मिळाल्यानंतर निर्माण होणारा भक्तिमय नाद वातावरणात चैतन्य निर्माण करतो. सामूहिक भजन-कीर्तनातून भक्त एकरूप होत असून, मनाला आनंद आणि उभारी मिळते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गावोगावी पुन्हा एकदा टाळ-मृदंगाचा नाद आणि कीर्तनाचे स्वर घुमणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पारंपरिक वेशभूषेत कीर्तनाची रंगत
ग्रामीण भागातील कीर्तन परंपरेचे वैशिष्ट्य आजही अनेक गावांमध्ये जपले जात आहे. रात्री साधारण नऊ ते अकरा या वेळेत होणाऱ्या कीर्तनासाठी टाळकरी, पखवाजवादक, पेटीवादक, गायक आणि विनाधारी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहतात. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ आणि कपाळावर बुक्का असा त्यांचा पारंपरिक पेहराव असतो.
निमंत्रित कीर्तनकार महाराज पांढरा शुभ्र फेटा बांधून उपस्थित राहतात. त्यांच्या सोबत चोपदार असतो. विनाधारी महाराजांकडे वीणा देतात. त्यानंतर परस्पर अभिवादन करून कीर्तनाला सुरुवात केली जाते. गायकाच्या ‘राम कृष्ण हरी’ या भजनाने वातावरण भक्तिमय होते आणि त्यानंतर टाळ-मृदंगाच्या साथीने कीर्तनाला रंगत चढते.
तरुणाईकडूनही परंपरेचे जतन
आधुनिक काळात मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील तरुणाई पारंपरिक कीर्तन, भजन आणि वाद्यांची परंपरा जपताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नव्या पिढीचा या सांस्कृतिक परंपरांशी संपर्क वाढत असून, गावागावांतील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होत आहे.
गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच राजापूर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये वाद्ये, सजावटीचे साहित्य आणि पूजासाहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. महागाईचा फटका बसला असला तरी गणेशोत्सवातील पारंपरिक वाद्यांचा नाद आणि कीर्तन-भजनांची परंपरा कायम ठेवण्यासाठी भक्तांची तयारी सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button