
खेडमध्ये रेल्वे ट्रॅकजवळ तरुणाचा मृतदेह आढळला
ट्रेनमधून पडून गंभीर दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज; अतिरक्तस्रावामुळे मृत्यू
खेड : खेड तालुक्यातील सुकिवली बौद्धवाडी परिसरातील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेत सनिल बाची खरात (वय २७, रा. तोस्लोले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांचा मृत्यू झाला.
पोलिस नोंदीनुसार, सनिल खरात हे कोणत्यातरी येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेतून पडल्याने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या गटारात पडले असावेत. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
ही घटना दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्यापूर्वी सुकिवली बौद्धवाडी शेजारील रेल्वे ट्रॅकजवळ घडल्याची नोंद आहे. याप्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




