
छतावरून अंगावर पडलेल्या नागाने घेतला दंश; १४ वर्षीय अक्षयला वालावलकर रुग्णालयात जीवदान!
न्यूरोटॉक्सिक सर्पदंशामुळे फुफ्फुसात पाणी, श्वसनाची गंभीर समस्या; तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक उपचारांनी दोन दिवसांत प्रकृती स्थिर
मंडणगड येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय अक्षय मोरे याच्यावर मध्यरात्री घरात झोपलेला असताना छतावरून अंगावर पडलेल्या नागाने पोटावर दंश केला. सर्पदंशानंतर अक्षयची प्रकृती झपाट्याने खालावली. श्वास घेण्यास त्रास, डोळे उघडता न येणे, तोंडातून लाळ गळणे आणि पोटात वेदना अशी गंभीर लक्षणे दिसू लागल्याने त्याला तातडीने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे अक्षयला तब्बल २५ वायल अँटी-स्नेक व्हेनम (ASV) देण्यात आले. मात्र, उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्याला श्वसनाचा त्रास वाढत गेला आणि रक्तातील प्राणवायूचे प्रमाणही कमी झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला चिपळूण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताना अक्षयमध्ये विषारी सर्पदंशामुळे होणारी न्यूरोटॉक्सिक विषबाधेची स्पष्ट लक्षणे दिसून आली. पापण्या झाकणे (Ptosis), त्यानंतर दुहेरी दिसणे (Diplopia), श्वसनाची तीव्र अडचण आणि श्वसनदमन अशी लक्षणे त्याच्यामध्ये आढळून आली. छातीच्या एक्स-रेमध्ये फुफ्फुसात पाणी साचल्याचे (Pulmonary Edema) दिसून आले. तसेच हृदयाची कार्यक्षमताही मंदावली होती.
अक्षयची गंभीर अवस्था लक्षात घेऊन वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. त्याला आवश्यक अँटी-स्नेक व्हेनम, प्राणवायू, फुफ्फुसातील पाणी कमी करण्यासाठी औषधे तसेच इकोकार्डिओग्राफीसह आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. त्याला अतिदक्षता विभागात ठेवून श्वसनाचे व्यवस्थापन आणि सतत वैद्यकीय देखरेख करण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे उपचारांना अक्षयने चांगला प्रतिसाद दिला. पुढील दोन दिवसांत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्याचे डोळे पूर्णपणे उघडू लागले, श्वास घेणे सुलभ झाले, हात-पायांची हालचाल पूर्ववत झाली आणि अखेर त्याची प्रकृती स्थिर झाली.
अक्षयच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत वालावलकर रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळाल्याने कुटुंबावरील मोठा आर्थिक भार कमी झाला.
अक्षयवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वाधवा, डॉ. संकेत आणि डॉ. श्रीयांस यांचा समावेश होता. पालकांनी सर्पदंश झाल्यानंतर वेळ न दवडता मुलाला पुढील उपचारांसाठी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे हलवल्याने उपचार सुरू करण्यास विलंब झाला नाही आणि अक्षयला जीवदान मिळाले.
सर्पदंश झाल्यास वेळ न दवडता रुग्णालयात दाखल करा
सर्पदंश झाल्यानंतर वेळ न दवडता रुग्णाला तातडीने सक्षम आणि आवश्यक उपचारांची सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यास गंभीर सर्पदंश झालेल्या रुग्णाचाही जीव वाचवता येऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सर्पदंशाच्या घटना घडल्यानंतर घरगुती उपचार किंवा वेळकाढूपणा न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.
अक्षयच्या प्रकृतीत झालेली सुधारणा ही वेळेवर केलेले उपचार, अतिदक्षता विभागातील व्यवस्थापन आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे



