
भोस्ते घाटात कारची दुचाकीला पाठीमागून धडक
महिलेला डोक्याला गंभीर दुखापत; दुचाकीस्वार जखमी, कारचालक अपघातानंतर वाहनासह पसार
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट वळणावर कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीस्वारालाही दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण संजय जंगम (वय ३८, रा. खोपी, श्रीरामनगर, ता. खेड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे आतेभाऊ संकेत चंद्रकांत जंगम हे त्यांच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक MH-08-BA-1153 घेऊन चिपळूणहून खेडच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीवर निलम चंद्रकांत जंगम (वय ५२, रा. पिरलोटे, साई मंदिराजवळ, ता. खेड) या उपचारासाठी खेड येथील डॉ. साळुंखे यांच्या दवाखान्यात जात होत्या.
भोस्ते पाट घळणाघर परिसरात आले असता, त्यांच्या मागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या झायलो कार क्रमांक MH-06-CU-0843 ने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. कारचालक निलेश भगवान मोरे (वय ३४, रा. कोहोले, ता. महाड, जि. रायगड) याने अपघातानंतर कारसह घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात निलम जंगम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, तर संकेत जंगम यांच्या पायाला मुकामार लागला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(घ) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



