
गणेशोत्सवाच्या तोंडावर लांजा उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने खुला दोन्ही लेन वाहतुकीसाठी सुरू; चाकरमानी, प्रवासी आणि लांजावासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका
लांजा : गणेशोत्सवाला अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक असतानाच लांजा शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी सुरू झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय झाली आहे. खासदार नारायण राणे आणि आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ रखडले होते. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा प्रश्न नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता.
गणेशोत्सव जवळ आल्याने उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी उड्डाणपुलाच्या एका लेनवर मुंबई ते गोवा दिशेने एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. पुढील काही दिवसांत दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपूल पूर्णपणे सुरू करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, उड्डाणपुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवातील वाहतूक कोंडीला मिळणार मोठा दिलासा
उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल सुरू झाल्याने प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
वर्षानुवर्षे रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने लांजावासीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास कमी होऊन स्थानिक व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांना त्याचा फायदा होणार आहे.
बहुप्रतीक्षित उड्डाणपूल गणेशोत्सवाच्या तोंडावर पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, खासदार नारायण राणे व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याचे स्वागत करण्यात येत आहे.



