
रक्षाबंधनाच्या राखीसह भावाची बहिणीच्या डोळ्यांसमोर पंचगंगा नदीत उडी
रुई पुलावर थरार; पाण्याच्या वेगामुळे शोधमोहीमेला अडथळा
कोल्हापूर : घरगुती वादातून रागाच्या भरात बाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोरच रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
घरातील वादानंतर पवन मोटारसायकलवरून बाहेर पडला. त्याच्या जिवाचे बरे-वाईट होऊ नये म्हणून बहिणीने त्याचा पाठलाग केला. रुई पुलावर तिने त्याला गाठले; मात्र बहिणीसमोरच त्याने पंचगंगा नदीत उडी घेतली.
घटनेनंतर नागरिकांनी नदीपात्रात शोध सुरू केला. हुपरी पोलिसांसह रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याचा वेग आणि खोलीमुळे शोधकार्यात अडथळे आले. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त बांधलेली राखी पवनच्या मनगटावरच असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




