
नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात


चिपळूण : चिपळूण शहर शिवसेनेच्या वतीने चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख उमेशदादा सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे चौथे वर्ष उत्साहात पार पडले. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान चिपळूणला मिळाला. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल २४० जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक उदय जुवळे, विकी लवेकर, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, फैसल मेमन, अल्ताफ चौघुले यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान नगरसेवक गणेशजी आग्रे, फैसल कास्कर, पाणी सभापती निहारजी कोवळे यांच्यासह चिपळूण शहरातील पोलीस मित्र, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी स्पर्धास्थळी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यामुळे स्पर्धास्थळी दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
या स्पर्धेत चिपळूणची जलतरणपटू माही अमित कदम हिने अंडर-१२ मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विविध गटांमध्ये एकूण १९ खेळाडूंनी चॅम्पियनशिप मिळवली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ खेळाडूंनी चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.
चिपळूण जलतरण तलावाचे प्रशिक्षक विनायक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या स्थानिक खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. अभिनव पवार याने १ सुवर्ण व ४ रौप्यपदके, विश्रुत साठे याने १ सुवर्ण व २ कांस्यपदके, तर पार्थ नटे याने १ सुवर्ण व ३ कांस्यपदके पटकावली. मेहंदी आतार हिने २ रौप्य, सैषा परब हिने १ रौप्य, तर स्वराली संसारे आणि ओवी कोरडे यांनी प्रत्येकी १ कांस्यपदक मिळविले.
महिला गटात निशा आंबेकर यांनी १ सुवर्णपदक, तर मनीषा वाघमारे यांनी १ कांस्यपदक मिळविले. स्थानिक जलतरणपटूंच्या या कामगिरीमुळे चिपळूण जलतरण तलावाचे नाव राज्यस्तरीय स्पर्धेत उज्ज्वल झाले.
स्पर्धेचे पंच म्हणून विनायक पवार यांनी काम पाहिले, तर सूत्रसंचालन विनोद राऊत यांनी केले. स्पर्धेचे निकाल अचूक व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी चैतन्य साठे आणि सत्यजित साळगावकर यांनी विशेष सॉफ्टवेअर तयार केले. जलतरण व्यवस्थापक प्रितम जाधव तसेच कोच शुभम गायकवाड, अनिकेत देवळेकर आणि सुजल महाजन यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे चिपळूणमधील युवा जलतरणपटूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले. राज्यभरातून आलेले खेळाडू, प्रशिक्षक व पालक तसेच चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे चिपळूण जलतरण तलावावर दिवसभर क्रीडा उत्साहाचे वातावरण होते.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करून चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख देणारा हा उपक्रम नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या वाढदिवस सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला.




